समाजसेवक निलेश उभाळे यांची तक्रार
पाचोरा (प्रतिनिधी) :- तालुक्यात अंगणवाडी मदतनिसांचा पगार नियुक्तीपासून अद्यापही झाला नसल्याने या ताईंवर मोठा अन्याय होत असल्याने तालुक्यातील समाजसेवक निलेश उभाळे हे ताईंच्या मदतीला धावले. याबाबत त्यांनी तक्रार वरिष्ठ स्तरावर दाखल केल्याची माहिती आज दि. २१ फेब्रुवारी रोजी निलेश उभाळे यांनी दिली.
तक्रारीत म्हंटले आहे की, पाचोरा तालुक्यातील एकात्मिक बाल विकास सेवाप्रकल्प अंगणवाडी या विभागात मदतनीस म्हणून सुमारे ५० ते ५५ महिलांना अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. सदर महिला या कामावर रुजू देखील झाल्या आहेत व नित्यनियमाने रोज कामावर हजर देखील होत आहेत. सदर नियुक्ती ही १ सप्टेंबर २०२३ रोजी पासून देण्यात आली होती. तरी त्या दिवसापासून ते आजपर्यंत एकाही दिवसाचा वा महिन्याचा पगार देण्यात आलेला नाही. इतर कोणतेही देय भत्ते देखील देण्यात आले नसल्याची माहिती तक्रारदार महिलांच्या तोंडून समोर आली.
अंगणवाडी सेविकांना पगार न मिळण्यामागील कारणीभूत असलेले अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील कठोर कारवाई व्हावी व लवकरात लवकर दोषींवर कठोर कारवाई होऊन सर्वच महिलांना पगार वेळेवर मिळून इतर देय भत्ते देखील मिळावेत अशी मागणी निलेश उभाळे यांनी केली आहे.