जामनेर तालुक्यातील पहूर येथील घटना, एकाला अटक
जामनेर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील एका गावात एका तीस वर्षीय तरुण महिलेवर एका नराधमाने अत्याचार करून तिला गर्भवती केले. त्यानंतर समाजात बदनामी होऊ नये म्हणून आई व भावाने एका महिला डॉक्टरांच्या मदतीने तिचा बेकायदेशीर गर्भपात केला. हि घटना एका निनावी माहितीमुळे उघड झाली असून याप्रकरणी चार जणांविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील बलात्कार करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
जामनेर तालुक्यातील एका गावात एक ३० वर्षीय महिला गावाजवळील नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. तेथे संशयित आरोपी शेनफडू रामदास सोनवणे याने पीडितेवर नदीच्या बाजूलाच ओढत नेऊन बलात्कार केला. तिला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार तीन ते चार वेळा जबरदस्ती केली. यामधून पीडित महिलेला गर्भधारणा झाली. पीडित महिलेने आई बेबाबाई सुपडू जाधव हिला सांगितले. बेबाबाई जाधव व तिचा भाऊ सागर जाधव यांनी भीती व बदनामीपोटी तिचा गर्भपात करण्याचे ठरवले.
त्यानुसार त्यांनी वाघारी गावातील डॉ. अनिता देवानंद सरताळे यांच्या क्लिनिकला घेऊन गेले. या ठिकाणी डॉ. अनिता यांनी बेकायदेशीर तिचा गर्भपात केला. हि घटना पोलिसांना माहित झाली. तसेच शासकीय पातळीवर माहिती गेल्यानंतर वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, जामनेरचे डॉ. विनय पंढरीनाथ सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी शेनफडू सोनवणे, बेबाबाई जाधव, सागर जाधव व डॉ. अनिता सरताळे यांच्याविरुद्ध पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
संशयित शेनफडू सोनवणे याला पोलिसांनी अटक केलेली आहे. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ४ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय बनसोड हे करीत आहे. पीडित महिला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली आहे.