भुसावळ येथील घटना
भुसावळ (प्रतिनिधी) :- रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून ८ लाखांची महागडी पॉवर केबल चोरी प्रकरणी भुसावळ रेल्वे सुरक्षा बलाच्या दोन हवालदारांना निलंबित करण्यात आले आहे. यात एका पोलिसाला अटक आहे. एकूण चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भुसावळातील रेल्वेच्या पीओएच कारखान्यातून ७ लाख ९४ हजार २२७ रुपये किंमतीची १६०४ किलो पॉवर केबल चोरीला गेल्याचा प्रकार १६ डिसेंबरला उघडकीस आला होता. याप्रकरणी संशयित सचिन उत्तम तायडे (२५, महादेव टेकडी, कंडारी, ता.भुसावळ), राहुल रतन मोरे (२३, महादेव टेकडी, कंडारी, ता.भुसावळ) व आरपीएफचे हवालदार शशिकांत गणपत सुरवाडे (५७, स्वामी विहार, भुसावळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. संशयिताना भुसावळ रेल्वे न्यायालयात हजर केले असता २४ पर्यंत आरपीएफ कोठडी सुनावण्यात आली.
अटकेतील तीन्ही आरोपींचा सुरक्षा यंत्रणेने जवाब नोंदवल्यानंतर त्यात पुन्हा एका आरोपीचे नाव समोर आल्याने त्यास अटक करण्यात आली. कुणाल लक्ष्मण मोरे (१९, महादेव मंदिराजवळ, कंडारी, ता.भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. दरम्यान, केबल चोरीनंतर ती विकून आलेल्या रकमेतील अर्धा हिस्सा हवालदार शशिकांत सुरवाडे याने ठेवल्याने त्यासदेखील या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले होते तर संशयिताला रेल्वे सुरक्षा बलाच्या आयुक्तांनी निलंबित केले आहे. त्याच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या यादव नामक कॉन्स्टेबललाही निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.