पुणे (वृत्तसंस्था) – एसटी महामंडळाच्या चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्याच्या वेतनासाठी आवश्यक असणारा निधी सध्या महामंडळाकडे उपलब्ध नसल्याने राज्य शासनाने महामंडळाला 300 कोटी रूपये देण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स कॉंग्रेस (इंटक) संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
करोना व्हायरसमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एसटी महामंडळाची सेवा बंद आहे. आज, दिड महिना झाला. एसटीची चाके फिरलेली नाहीत, त्यामुळे महामंडळाचे आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडून गेले आहे. विविध सवलतीच्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाकडून येणारे उत्पन्न सुद्धा यावेळी देण्यात आलेले नाही.
महामंडळाकडे सध्या वेतन देण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत त्यामुळे शासनाने 300 कोटी रूपये द्यावेत म्हणजे कर्मचाऱ्याचे वेतन तरी देण्यात येईल, अशी मागणी करणारे निवेदन माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.







