जळगाव तालुक्यातील घटना, मयत बामणोद येथील रहिवासी
कुटुंबीय तक्रार देण्यास आले, तेव्हा मृत झाल्याची मिळाली माहिती
जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील नागझिरा शिवारातील गिरणा नदीपात्रात एका तरुणाचा मृतदेह जळगाव तालुका पोलीस स्टेशनला मिळून आला होता. दरम्यान, या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरु असतानाच, मयत व्यक्तीचे कुटुंबीय पोलीस स्टेशनला बेपत्ता असल्याची तक्रार द्यायला आले. तेव्हा घटनेचा पूर्ण उलगडा पोलिसांना झाला. मयत व्यक्ती यावल तालुक्यातील बामणोद येथील रहिवासी आहे. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद केल्यावर तसेच शवविच्छेदन झाल्यावर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
गणेश सीताराम पाटील (वय ३५, रा. बामणोद ता. यावल) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तो बामणोद गावात आई लीलाबाई, मोठा भाऊ संदीप, वहिनी, पुतण्यांसह राहत होता. संदीप हा भाजीविक्रेता असून त्याला मयत गणेश हा मदत करीत होता. जळगावात वडनगरी येथील मागील आठवड्यात झालेल्या प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेत शनिवार ९ डिसेंबर रोजी आईसोबत गणेश हादेखील गेला होता. दरम्यान कथा संपल्यावर ११ रोजी आई लीलाबाई यांना मुलगा गणेश दिसून आला नाही. त्यांनी शोधाशोध केली. मात्र मुलगा न मिळाल्याने लीलाबाई घरी बामणोद येथे परत आल्या.
अशी पटली ओळख
गणेशच्या कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरु केली. पण तो मिळत नव्हता. दुसरीकडे जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नागझिरा शिवारात दि. १४ रोजी गिरणा नदीपात्रात तरुणाचा मृतदेह मिळाला. तो त्यांनी शासकीय रुग्णालयात पाठविला. त्याची ओळख पटविण्यासाठी आवाहन केले. त्याचा तपास सुरु होता. दरम्यान, गणेशच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी १५ रोजी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला धाव घेत बेपत्ता झाल्याची नोंद करण्यास आले होते. तेव्हा पोलिसांनी त्यांना नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा फोटो दाखविला तसेच शासकीय रुग्णालयातील मृतदेह दाखविला तेव्हा गणेश पाटील याची ओळख पटली. तेव्हा कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला.
पोहण्यासाठी उतरला, वाहत नागझिरा शिवारातील पात्रात गेल्याचा अंदाज
दरम्यान, महाशिवपुराण कथेत अनेक भाविक वडनगरी शिवारापासून जवळच काही अंतरावर गिरणा नदी पात्रात अंघोळीसाठी जात होते. त्याचप्रमाणे गणेश पाटील हादेखील आईची नजर चुकवून पोहायला गेला असावा. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने वाहून गेला असावा. पुढे नागझिरा शिवारातील गिरणा नदी पात्रात तो अडकला असेल. त्यामुळे त्याचा मृतदेह तेथे सापडला, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तपासासाठी पोहेकॉ अनिल फेगडे, संजय भालेराव, अनिल मोरे यांनी परिश्रम घेतले. पुढील तपास पोहेकॉ लीलाधर महाजन करीत आहे.