जेजुरी (वृत्तसंस्था) – खंडेरायाच्या जेजुरी नगरितील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या श्री मार्तंड देवसंस्थानने निर्माण केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी डायलिसिस सेंटरमधील करोनाबाधित कर्मचाऱ्याचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या डायलिसिस व देवसंस्थान कर्मचारी, अधिकारी अशा एकूण 32 जणांचा अहवालही निगेटिव्ह आल्याने जेजुरीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला असून जेजुरी करोनामुक्त असल्याचे अधोरेखित झाले आहे.
या सेंटरमधील लॅब टेक्निशियन म्हणून कार्यरत असलेल्या 24 वर्षीय युवक कर्मचाऱ्याने सुरक्षिततेचा भाग म्हणून स्वत:सह एका रुग्णाची कोविड 19ची चाचणी एका खासगी लॅबमध्ये बुधवारी (दि. 6) केली होती. शुक्रवारी (दि. 8) रात्री डायलिसिस रुग्णाचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला तर लॅब टेक्निशियनचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता, त्यामुळे पुरंदर तालुक्यात करोनाबाधित असलेला पहिलाच रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. बाधित तरुणाला शनिवारी (दि. 9) पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. विशेष म्हणजे या रुग्णामध्ये सर्दी, ताप, खोकला अशी कोणतीच लक्षणे आढळून येत नव्हती.
पुणे येथे तपासणीसाठी नेण्यात आलेल्या बाधित रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह असल्यानंतर त्यांनाही रुग्णालयातून सोडण्यात आले असून 14 दिवसांसाठी होमक्वारंटाइन करण्यात आले आहे. तर शहरातील एका लॉजमध्ये क्वारंटाइअन करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना घरी सोडण्यात आले असून 14 दिवस त्यांना होमक्वारंटाइन राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लॉजमधून घरी सोडण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे देवसंस्थान कार्यालयात फुले उधळून स्वागत करण्यात आले. तद्नंतर त्यांना घरी पाठवण्यात आले. तर लॅब टेक्निशियनला एक ठिकाणी होम क्वारंटाइन ठेवण्यात आले आहे.
संबंधित लॅब टेक्निशियनचा पहिला अहवाल पॉझिटिव्ह निघालेल्यानंतर सरकारी अहवाल निगेटिव्ह आल्याने पहिल्या अहवालात नेमकी चूक काय झाली? हा प्रश्न अनुत्तरित आहे. या साऱ्या प्रकारामुळे देवसंस्थानच्या उपक्रमांना मोठी खीळ बसली आहे. होमक्वारंटाइअन कालावधी संपताच नंतर पुन्हा सर्व अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांच्या सेवेला हजर होणार असल्याचे मंदिर व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.







