भवरलालजी जैन यांच्या पर्यावरण विषयक कार्याचा केला जागर
जळगाव (प्रतिनिधी) – संयुक्त अरब अमिराती (युएई) मधील एक्स्पो सिटी, दुबई येथे युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंजच्या २०० देशातील सदस्यांचे ‘कॉप २८’ परिषदेचे २८ वे सत्र नुकतेच संपन्न झाले. त्यास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. यात जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक तथा उपाध्यक्ष अनिल जैन तसेच अभेद्य जैन उपस्थित होते. त्यात शेती आणि क्लाइमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादीबाबत भारताच्यावतीने चर्चा सत्रात सहभागी होऊन मत मांडण्याची संधी अनिल जैन यांना प्राप्त झाली.
यंदाच्या २८ व्या परिषदेला जगभरातील मान्यवर उपस्थित होते. या परिषदांचे आयोजन संयुक्त राष्ट्र संघामार्फत केले जाते. हवामान बदलाशी लढा देण्यासाठी प्रभावी मार्गांचे मूल्यांकन करणे आणि युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन क्लायमेट चेंज (यूएनएफसीसी) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार हवामान कृतीची योजना आखली जाते. १९९५ मध्ये बर्लिन येथे पहिल्या कॉप’ परिषदेचे आयोजन करण्यात आले होते तर गतवर्षीची ‘कॉप २७’ इजिप्तमध्ये पार पडली होती.
सोशल प्राेटेक्शन अॅण्ड क्लाइमेट चेंजच्या परिसंवादात मनोगत व्यक्त करताना अनिल जैन यांनी सांगितले की, ‘शेतकऱ्यांच्या सक्रिय सहभागासाठी जैन इरिगेशन त्यांना तंत्रज्ञान, मार्गदर्शन, प्रोत्साहन देते, अल्पभूधारक शेतकरी हे त्यांनी पिकवलेल्या अन्नधान्यातून सगळ्या समाजाला उपकृत करण्याची महत्त्वाची कामगिरी करत असतात. या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी व त्यांचे सशक्तीकरण करण्यासाठी विविध सामाजिक सुरक्षा उपाय राबविले जातात. ज्यात माहिती तंत्रज्ञानाचा वापर, ज्ञान, आणि सामाजिक प्रतिष्ठा हे घटक अंतर्भूत आहेत.’ या सह त्यांनी भारत देशाकडे प्रमुख जबाबदारी असलेल्या इंटरनॅशनल सोलर अलायन्सच्या परिसंवादात ही आपली भूमिका विषद केली.
जैन उद्योग समूहाच्या एकूणच वाटचालीचा अभ्यास केला असता कृषी क्षेत्रातील कामकाजात पर्यावरणाचा हाच ध्यास भवरलालजींनी घेतल्याचे अभ्यासकांना जाणवत असते. ३७ वर्षांपूर्वीच जैन इरिगेशन कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पर्यावरणासंदर्भातील योग्य ती भूमिका घेण्यात आली. भवरलालजींनी ३७ वर्षांपूर्वीच पर्यावरणात काय बदल होतील व त्यादृष्टीने आपण काय केले पाहिजे हे निश्चित केले होते आणि कृतिही सुरू केली होती. पर्यावरणाची भविष्यात होणारी हानी रोखण्यासाठी मी काय करू शकतो, माझी कंपनी काय करू शकते, माझे सहकारी काय करू शकतात हे ठरवून भाऊंनी उत्पादने, ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दिशा देण्याचे काम केले, अल्पभूधारक शेतकऱ्यांचेही भले व्हावे यासाठी विज्ञान, तंत्रज्ञानातून निसर्गाशी एकरूप होऊन मिळकत वाढवून समाजात संपन्नता आणि प्रतिष्ठा शेतकऱ्यांना मिळवून दिली. भवरलालजी जैन यांनी भूमिपुत्रांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडविले.