मुक्ताईनगर तालुक्यातील पिंप्राळा येथे घडली घटना
मुक्ताईनगर (प्रतिनिधी) :- तालुक्यातील कुऱ्हा काकोडा जवळ असणाऱ्या पिंप्राळा गावात शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तो जखमी झाल्याची घटना शनिवारी २ डिसेंबर रोजी दुपारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी वनविभागाने भेट देऊन जखमीची चौकशी केली आहे.
गणेश गणपत झाल्टे (वय ३४, रा. पिंप्राळा ता. मुक्ताईनगर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. तो पिंप्राळा येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. शनिवारी दुपारी तो शेतात काम करीत असताना त्याच्यावर बिबट्याने झडप मारून हल्ला केला. गणेश झाल्टे याने तो हल्ला परतवून लावल्याने बिबट्याने धूम ठोकली. दरम्यान हल्ल्यात त्याच्या डाव्या हाताच्या खांद्याला जखमा झाल्या आहेत. जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात येऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी गणेश झाल्टे याची माहिती घेऊन विचारपूस केली. तर माहिती मिळताच कुटुंबीयांनी व पोलिसांनीदेखील घटनास्थळी धाव घेतली होती.