जळगाव शहरातील जुना खेडी रोडवरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील जुना खेडी रोडवरील टेलर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत सुमारे १ लाख ८७ हजारांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे
प्रल्हाद छगन बाविस्कर (वय-४९, रा. जुना खेडी रोड, जळगाव) हे टेलरींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे जुना खेडीरोडवर जितू टेलर नावाचे दुकान आहे. शनिवारी २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या टेलर दुकानाला अचानक आग लागली. या आगीत शिवलेले व न शिवलेले कपडे, मशिनरी साहित्य असा एकुण १ लाख ८७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जळून खाक झाला आहे.
यावेळी महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्याने ही आग आटोक्यात आणण्यात आली. दुकानदार प्रल्हाद बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले हे करीत आहे.