अमळनेर तालुक्यातील गाव पिंपरी येथील घटना
अमळनेर (प्रतिनिधी) – शौचालयाच्या टाकीत दोन वर्षाचा चिमुकला पडल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कावपिंप्री येथे सोमवारी १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
भूषण दिलीप सोनवणे (वय-२) रा. कावपिंप्री ता. अमळनेर असे मयत चिमुकल्याचे नाव आहे. कावपिंप्री येथील अशोक सोनवणे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू असल्याने त्याठिकाणी शौचालयासाठी लागणारी टाकीचे बांधकाम करण्यात आले असून ही टाकी पुर्णपणे पाण्याने भरलेले होते. दरम्यान भूषण सोनवणे याचा शौचालयाच्या टाकीत पडून बुडून मृत्यू झाला होता. त्याचे आजोबा लिलाधर गोविंदा सोनवणे यांना शौचालयाच्या टाकीत चिमुकला भूषण हा टाकीत मृतावस्थेत तरंगतांना दिसून आला. त्याला बाहेर काढून तातडीने अमळनेर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याबाबत अमळनेर पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयत मुलगा भूषण याचे वडील दिलीप लीलाधर सोनवणे यांचे १७ ऑक्टोबर रोजी दुर्धर आजाराने निधन झाले होते. त्यातच आता दिपावलीच्या दिवशी चिमुकलाचा दुदैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली असून सोनवणे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.