लग्नासाठी जाताना भुसावळ तालुक्यात घडली घटना, असोदा गावावर शोककळा
जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ येथे लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला राष्ट्रीय महामार्गावर भुसावळ तालुक्यातील साकेगाव गावाजवळ वाघुर नदीवरील पुलावर बसने जबर धडक दिली. त्यात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या महिला गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.
कुतुबुद्दीन शेख अजमोद्दीन (वय ६५, रा. असोदा ता. जळगाव) असे मयत इसमाचे नाव आहे. पत्नी मजरुन्निसा शेख कुतुबुद्दीन (वय ६०) या मृत्यूशी झुंज देत आहेत. ते मिस्त्री काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. ते भुसावळ येथे एका लग्नाच्या कार्यक्रमानिमित्त पत्नीसह दुचाकीने (एम.एच. १९ एम. ०६८७) जात होते. तेव्हा जळगावकडे जाणाऱ्या एसटी बसने ( एम.एच. २० बी.एल. २७३९) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. जोरदार धडकेत दुचाकीस्वार कुतुबुद्दीन शेख यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेल्या त्यांच्या पत्नी मजरुन्निसा शेख कुतुबुद्दीन (वय ६०) या गंभीररित्या जखमी झाल्या आहेत.
जखमी मजरुन्निसा शेख यांना तातडीने नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरु असून प्रकृती गंभीर आहे. तर मयत कुतुबुद्दीन शेख यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्यान अपघात झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी भुसावळ तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. घटनेची भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. मयत कुतुबुद्दीन यांच्या पश्चात दोन २ मुले असून असोदा गावात शोककळा पसरली आहे.