खडसेंची प्रकृती स्थिर, वैद्यकीय पथकाची माहिती
जळगाव (प्रतिनिधी) : येथील विधानपरिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते आ. एकनाथराव खडसे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांच्या पुढील उपचारासाठी त्यांना मुंबई येथे एअर ऍम्ब्युलन्सने मुंबई येथे हलविण्यात येत असून अँब्युलन्ससाठी मुख्यत्र्यांनी त्यांचे स्वीय सहायक मंगेश चिवटेंना सूचना दिल्या आहे. त्यानुसार संध्याकाळी ६ वाजता जळगाव विमानतळ येथे अँब्युलन्स येणार आहे.
एकनाथराव खडसे यांना दोन दिवसांपासून छातीत दुखण्याचा त्रास होत होता. त्याकरिता त्यांनी जळगावात रविवारी ५ नोव्हेंबर रोजी दुपारी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक चौधरी यांच्याकडे तपासणी केली. त्यांच्या शरीरात जळजळ व छातीत दुखण्याचा त्रास होत असल्याबाबत तपासणीत दिसून आले आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यानुसार त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईत बॉंबे रुग्णालयात हलविण्याबाबत सल्ला देण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी त्यांचे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे प्रमुख तथा स्वीय सहायक मंगेश चिवटे यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.
जळगावात विमानतळावर एअर अँब्युलन्स संध्याकाळी ६ वाजता येणार आहेत. त्यासाठी वैद्यकीय सहायता कक्षाचे जितेंद्र गवळी हे जळगावातून समन्वयन करीत असून एकनाथराव खडसे यांना मुंबईत रात्री ८ वाजेपर्यंत बॉंबे रुग्णालयात दाखल केले जाईल. आ. खडसे यांच्यासोबत जिल्हा बँकेच्या संचालिका रोहिणी खडसे, डॉ. अभिषेक ठाकूर, अशोक लाडवंजारी आदी कार्यकर्ते उपस्थित आहेत. रविवारी कार्यकर्त्यांची डॉ. विवेक चौधरी यांच्या रुग्णालयाबाहेर गर्दी झालेली होती.