जळगावातील विठ्ठल पेठ येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात आत्महत्येचे सत्र सुरूच असून मागील २५ दिवसांत गणेश कॉलनी येथील १४ वर्षाचा मुलगा व समता नगर येथील १६ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्यानंतर आता शहरातील विठ्ठलपेठ परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने कोणत्यातरी तणावातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास समोर आली. यावेळी नातेवाईकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात एकच आक्रोश केला होता. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.
ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी (वय-१७, रा. विठ्ठल पेठ, जळगाव) असे मयत झालेल्या अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ट्विंकल उर्फ पूजा सुरेश चौधरी ही अल्पवयीन मुलगी आई,वडील व लहान भाऊ यांच्यासोबत विठ्ठलपेठ परिसरात वास्तव्याला होती. तिने नुकतेच दहावीचे शिक्षण पूर्ण करून शहरातील का.ऊ. कोल्हे विद्यालयात अकरावीचे शिक्षण घेत होती. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ती कोणत्यातरी तणावात होती. शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सकाळी तिची आई नातेवाईकांकडे शिरपूर येथे गेले होत्या, तर वडील हे शेतीच्या कामासाठी शेतात गेले होते. त्यावेळी दुपारी ट्विंकल ही लहान भाऊ दीपक याच्यासोबत घरीच होती. दुपारी अडीच वाजता लहान भावाला दुकानावर काही वस्तू घेण्यासाठी पाठवले होते.
त्यानंतर तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. थोड्यावेळाने लहान भाऊ दीपक घरी आल्यावर बहिणीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने हंबरडा फोडत नातेवाईकांना व शेजारच्यांना बोलवले. शेजारी राहणाऱ्यांनी तिला खाली उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी तपासणीअंती मयत घोषित केले. नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.