जळगाव (प्रतिनिधी) – जगातील विविध ठिकाणच्या तरुण डिझायनर, लेखक आणि डिझाईन क्षेत्रातील जाणकार संपादकीय मंडळाद्वारा ‘डिझाईन इंडिया’ या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या वार्षिक ‘द डिझाईन इंडिया शो २०२३’ शीर्षकान्वये प्रतिष्ठित सोहळ्यात जळगावच्या पालवी जैनचा “बेस्ट डिझाईन स्टूडंट” ॲवार्ड ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. दि. ७ ऑक्टोबर रोजी पुण्यातील ‘रीत्झ कार्लटन’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये डिझाईन क्षेत्रातील देशविदेशातील मान्यवरांच्या उपस्थितीत पालवीला गौरविण्यात आले.
जैन इरिगेशनच्या कला विभागातील आर्टिस्ट विजय जैन यांची सुकन्या पालवी अहमदाबाद येथील निरमा युनिव्हर्सटीमध्ये प्रॉडक्ट डिझाईनचे शिक्षण घेते आहे. पालवीने गेल्या तीन वर्षात सृजनशील उपक्रमात निवडक प्रोजेक्ट तयार केले असून, त्यात कलात्मक खेळणी, चिमुकल्यांसाठी नावीन्यपूर्ण चमचा तसेच इतर विविध माध्यमातील वैशिष्ठ्यपूर्ण कामांचा समावेश आहे. कला आणि उपयुक्तता सिद्ध झाल्याने पालवीचा सन्मान करण्यात आला आहे. अतिशय नेत्रदीपक अशा या सोहळ्यात देशातील बेस्ट डिझाईन प्रोजेक्ट्स, बेस्ट डिझाईन स्टुडिओ आणि बेस्ट इनहाऊस स्टुडिओजसुद्धा गौरव करण्यात आला.
पुरस्कार निवड प्रक्रियेतील ज्युरी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्याविभूषित आहेत. व्हिएतनाम, अमेरिका, दुबई, बंगलोर, जयपूर आणि पुणे विद्यापीठाच्या डिझाईन स्कूलचे डीन, एज्युकेटर, विविध डिझाईन स्टुडिओचे नामांकित डिझायनर, निरमा युनिव्हर्सिटीचे हेड ऑफ डिपार्टमेंट, मार्गदर्शक शिक्षक यांनी पालवीच्या सृजनशील कार्याची विशेषत्वाने दखल घेतली. पालवीच्या सुयशाबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी तिचे विशेषत्वाने कौतुक केले असून पालवीला उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.