नशिराबाद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव ( प्रतिनिधी ) – भुसावळहून जळगावला रेल्वेने प्रवास करत असतांना धावत्या रेल्वेतून पडल्याने भुसावळ शहरातील ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील भादली गावाजवळ घडली आहे. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरेश गोकुळप्रसाद परदेशी (वय-५५) रा.गोलाणी कॉम्प्लेक्स, वरणगाव रोड, भुसावळ असे मयताचे नाव आहे.
नरेश परदेशी हे आपल्या आई व पत्नी यांच्यासोबत भुसावळ शहरातील गोलाणी कॉम्प्लेक्स येथे राहायला होते. बुधवारी ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ते नागपुर येथील मुलीकडे जात असल्याचे सांगून निघाले होते. त्यानंतर ते नागपूरकडे न जाता भुसावळहून जळगावला येण्यासाठी रेल्वेने प्रवास करत असतांना त्याच्या तोल जावून धावत्या रेल्वेतून खाली पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना रात्री ८ वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील भादली गावानजीक घडली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नशिराबाद पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. मयताच्या पश्चात पत्नी, आई आणि मुलगा असा परिवार आहे. याबाबत नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.