यावल तालुक्यातील चितोडा येथील घटना
यावल (प्रतिनिधी) – तालुक्यातील चितोडा येथील २३ वर्षीय तरूणास दोन महिलासह पाच जणांनी अज्ञात कारणावरून चापटाबुक्क्यांनी मारहाण करत धमकी दिल्याने युवकाने घाबरून जाऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी दोन महिलांसह ५ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे कारणावरून यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चितोडा येथील दुर्गेश संतोष किनगे (वय-२३), या तरूणास अज्ञात कारणावरून गावातील भास्कर आनंदा जंगले, रजनी भास्कर जंगले, भूषण भास्कर जंगले, रेखा भूषण जंगले, ज्ञानेश्वर भास्कर जंगले यांनी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या पुर्वी गावात दुर्गेश संतोष किनगे यास त्याच्या घरासमोर चापटा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ करीत तु गावातून निघून जा अशी धमकी दिली.
युवकाने घाबरून जात यावल शिवारातील देविदास तुकाराम पाटील यांचे गट नंबर ५५७ चे शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. प्रथम गुरुवारी दुपारी चितोडा गावाचे पोलीस पाटील पंकज वारके यांचे खबरी वरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तर सायंकाळी उशिरा मयताचे वडील संतोष किनगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित ५ जणांविरुद्ध तरुणास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे घटनेचा तपास पुढील तपास करीत आहेत.