जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदांच्या शाळांचे वास्तव उघड
जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना उकाड्यापासून सुटका मिळावी म्हणून एका विद्यार्थ्याच्या पालकाने चक्क पंखा भेट दिला. शनिवारी पालक सभा झाली. त्यावेळी त्यांनी पंखा मुख्याध्यापकांकडे सुपूर्द करीत दातृत्व दाखविले. मात्र, यामुळे मूलभूत सुविधांपासून विद्यार्थी वंचित असल्याबाबत जिल्हा परिषदेच्या शाळांचे वास्तव उघड झाले आहे.
जि. प. केंद्रीय मुलांची शाळा, कजगाव ता. भडगाव येथे आज शनिवारी दि. २३ रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. सभेमध्ये पालकांनी शाळेतील शैक्षणिक वातावरणाबद्दल मनोगतामधून समाधान व्यक्त केले. इ. ४थी अ या वर्गातील विद्यार्थी प्रणव सुनील महाजन याचे वडील सुनिल भगवान महाजन यांनी वर्गामध्ये पंखा नसल्याने मुलांना गरम होऊ नये, उकाडा जाणवू नये म्हणून स्वखर्चाने वर्गासाठी ताबडतोब पंखा घेऊन दिला.
पालक सभेत त्यांनी तो पंखा मुख्याध्यापक श्रीमती गोसावी आणि वर्गशिक्षिका श्रीमती भांडारकर यांच्याकडे सुपुर्द केला. यामुळे सुनील महाजन यांच्या दातृत्वाचे पालक सभेत कौतुक झाले. मात्र जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी प्रशासनाने तातडीने मदत केली पाहिजे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता साधा पंखादेखील नसावा, हे विचार करण्यासारखे आहे. संपूर्ण जिल्ह्यात जिल्हा परिषदेचे बीडीओपासून सीईओपर्यंत सर्वानी लक्ष देण्याची गरज आहे.