जळगाव ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन व जैन स्पोर्टस् अॅकॅडमी आयोजित राष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट स्पर्धा जळगाव येथील अनुभूती निवासी स्कूल येथील मैदानावर सुरू आहेत. वरिष्ठ गटाच्या या स्पर्धेत महाराष्ट्र, तामिळनाडू, त्रिपुरा, पश्चिम बंगाल या राज्याचे संघ सहभागी असुन आतापर्यंत पश्चिम बंगाल संपूर्ण स्पर्धेत अव्वल स्थानावर कायम आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र संघ पोहचला असून नेट रनरेटही चांगला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)तर्फे घेण्यात येणाऱ्या आंतरराज्य महिला वरिष्ठ गटाच्या स्पर्धेपुर्वी जळगावात प्रथमच होणाऱ्या यास्पर्धेकडे राष्ट्रीय स्पर्धेची पुर्व तयारी स्पर्धा म्हणून बघितले जात आहे. दि.१५ ते २३ सप्टेंबर दरम्यान खेळविल्या जाणाऱ्या या स्पर्धेचा चौथा दिवस होता.
आजच्या पहिल्या सामन्यात पश्चिम बंगाल विजयी
चौथा दिवसाचा पहिला सामना त्रिपुरा विरूद्ध बंगाल असा खेळविण्यात आला. त्रिपुरा संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या पश्चिम बंगाल संघाने निर्धारित २० षटकांत झुमिया खातून ३६ (३७ चेंडू) धावा च्या मदतीने ८ गडी गमावून १११ धावा केल्यात. त्रिपुरा तर्फे हिना हिने सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्रिपुरा संघाने ११२ धावांचे लक्ष्य घेऊन फलंदाजी करताना रिजू सहा हिच्या नाबाद ४३ धाव वगळता एकही फलंदाज तग धरू शकला नाही. त्रिपुरा संघ ५ गडी बाद १०३ धावांपर्यंत मजल मारता येईल. बंगाल संघ ८ धावांनी विजयी झाला. ह्या सामन्यात ३६ धावा व २ बळी घेणारी झुनिया खातून ही सामनावीर ठरली. अनुभूती निवासी स्कूलचे व्यवस्थापक विक्रांत जाधव यांच्याहस्ते ट्रॉफी देऊन तिचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी सुत्रसंचालन अरविंद देशपांडे यांनी केले.
महाराष्ट्राचा तामिळनाडूवर ६६ धावांनी विजय
आजचा दुसरा सामना महाराष्ट्र विरूद्ध तामिळनाडू यांच्यात खेळला गेला. महाराष्ट्र संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. यात किरण नवगिरे ३८ (२५ चेंडू) धावा, कर्णधार तेजल हसनबनीस ३० (३१ चेंडू), अनुजा पाटील २३ (१४ चेंडू), आदिती गायकवाड २१ (२६ चेंडू) नाबाद यांच्या योगदानामुळे निर्धारिती २० षटकांत ६ गडींच्या मोबदल्यात १२५ धावा केल्यात. १२६ धावांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या तामिळनाडू संघाची सुरवात अडखळत झाली. अर्शी चौधरी १२, सबरिना १९ यांनी महाराष्ट्र संघाच्या आक्रमक गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र इतर फलंदाजींनी अपेक्ष प्रमाणे कामगिरी न केल्याने तामिळनाडूचा संघ १८ व्या षटकात फक्त ५९ धावांमध्ये गारद झाला. महाराष्ट्र संघातर्फे श्रद्धा, भक्ती, ईशिता यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. तर रसिका, अदिती गायकवाड, अनुजा पाटील यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. ऑलऑउंटर कामगिरी करणाऱ्या अनुजा पाटील हि सामनावीर ठरली. तिला जैन इरिगेशनचे मिडीया व्हाईस प्रेसिडेंट यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अरविंद देशपांडे, पंच संदिप जारे, अनिल सोनवणे उपस्थित होते. मुश्ताक अली यांनी सुत्रसंचालन केले.