जळगाव तालुक्यातील शिरसोलीत येणार पंचक्रोशीतील लोकं
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली येथे हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडविणाऱ्या शगज्जन बाबांचा उरुस पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करच्या दिवशी (दि. १५) साजरा होत असून, करमणुकीसाठी दोन दिवस सायंकाळी लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिरसोलीपासून ३ किमी अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात शगज्जन शहा बाबांचा दर्गा आहे. दर वर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी करेला शगज्जन शहा बाबांचा उरुस निमित्त यात्रोत्सव साजरा होतो
यात्रेच्या दिवशी हिंदू, मुस्लिम बांधवांकडून या ठिकाणी दर्ग्याचे दर्शन घेऊन वरण बट्टीसह गोड भाताने नवस फेडले जातात. मुस्लीम बांधवांकडून पोळ्याच्या दिवशी संपूर्ण गांवातून सकाळी नऊ वाजेदरम्यान सवाद्य संदल मिरवणूक काढली जाते. ती दर्ग्यापर्यंत जाते.
■ शगज्जन बाबांच्या दर्ग्याजवळ विहीर असून, ती कधीही आटत नाही. त्यातील पाणी प्यायल्याने आजार दूर होतात, अशी आख्यायिका आहे, अशी माहिती शिरसोली प्र न. सरपंच हिलाल भिल यांनी दिली.
यात्रेत पाळणे, खेळणी यांचे आकर्षण असते. यात्रेकरूंचे मनोरंजन व्हावे यासाठी शिरसोली प्र न. येथे दि. १५ रोजी संध्याकाळी ४ ते १० संगीता राणी पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे. करच्या दुसऱ्या दिवशी शिरसोली प्र.बो. येथे सायंकाळी ४ ते ११ या वेळेत मनीषा राठोड यांच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेकरू व ग्रामस्थांनी यात्रोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन औद्योगिक पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी केले आहे.