मंत्री गिरीश महाजन बसले अधिष्ठातांच्या खुर्चीवर : पालकमंत्री, आमदार शेजारी !
वैद्यकीय महाविद्यालयात घडला अजब प्रकार, दिवसभर चर्चा
जळगाव (प्रतिनिधी) – शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अजब किस्सा घडला. तेथील रुग्णालयाच्या अद्ययावत शस्त्रक्रियागृहाचे उदघाटन करायला पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे आले होते.त्यानंतर ते अधिष्ठाता कक्षात आले असता, मंत्री गिरीश महाजन हे थेट अधिष्ठातांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यामुळे गोंधळलेले पालकमंत्री गुलाबराव पाटील हे शेजारच्या खुर्चीवर बसले. आता वैद्यकीय शिक्षण मंत्री नसतांनाही तसेच, पालक मंत्री देखील नसताना थेट सुपर क्लासवन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर गिरीश महाजन कसे काय जाऊन बसले याबाबत दिवसभर चर्चा रंगली होती.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शनिवारी शस्त्रक्रियागृहाचे उदघाटनाची कार्यक्रम पार पडला. तेथे मुंबईचे डॉक्टर्सची टीम देखील आलेली होती. याठिकाणी मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आ. राजूमामा भोळे यांनी उपस्थिती दिली. महाविद्यालयात सकाळी मंत्र्यांचे आगमन झाले. त्यानंतर ते अधिष्ठाता यांचे कक्षात गेले. तेथे गेल्यावर मंत्री गिरीश महाजन हे अधिष्ठात्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले. त्यानंतर पालकमंत्री गुलाबराव हे गिरीश महाजन यांचे बाजूला तर आ. राजूमामा त्यांच्या शेजारी बसले. अधिष्ठातांना खुर्ची आणून द्यावी लागली.
मात्र गिरीश महाजन हे पालकमंत्री अथवा वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्रीदेखील नाही. अजितदादा पवार यांच्या समावेशामुळे गिरिश महाजन यांचे वैद्यकीय शिक्षण खाते हे कोल्हापूरचे हसन मुश्रीफ यांचेकडे गेले आहे. गिरीश महाजन यांच्या या किस्स्याची दिवसभर चर्चा दिसून आली.