अवैध वाळू व्यावसायिकांची हिम्मत वाढली, आणखी एका महिला अधिकाऱ्याला दमदाटी
जळगाव शहरातील केसी पार्क येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात अवैध वाळू व्यवसायिकांची हिम्मत दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. यावल तालुक्यात एका महिला अधिकाऱ्याला अवैध व्यावसायिकांनी दमदाटी केल्याची घटना ताजी असतांना शुक्रवारी १ रोजी पुन्हा जळगाव शहरात अवैध वाळू व्यावसायिकांनी गुंडगिरी केल्याचे दिसून आले आहे. केसी पार्क परिसरात वाळू वाहतूक रोखण्यासाठी पेट्रोलिंग दरम्यान कारवाई करीत असलेल्या महसूल विभागाच्या महिला पथकाशी वाद घालून दमदाटी केली व वाळूचे ट्रॅक्टर पळवून नेण्यात तिघांनी मदत केली. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंडळाधिकारी सारिका दुरगुडे, छाया कोळी, तलाठी मृणाली सोनवणे, आदिती जाधव, राजकन्या घायवट, प्रज्ञाराणी वंजारे, अनिता झाल्टे यांचे भरारी पथक शुक्रवारी पेट्रोलिंग करीत होते. दुपारी १२ वाजता कानळदा रोडवरील केसी पार्क येथे विना क्रमांकाचे ट्रॅक्टर व वाळूने भरलेली ट्रॉली आढळून आली. पथकाने त्यासमोर दुचाकी लावून ट्रॅक्टर चालकास रोखले. त्याची चौकशी करीत असताना चालकाचे तीन साथीदार तेथे आले. त्यांनी शाब्दिक वाद घालून दमदाटी करून पथकाच्या दुचाकी ट्रॅक्टर समोरून बाजूला केल्या. तसेच, तलाठी मृणाली सोनवणे यांच्या दुचाकीला धक्का देत बाजूला करीत ट्रॅक्टर चालकाला पळून जाण्यास मदत केली.
या अवैध वाळू व्यावसायिकांनी शासकीय कामात अडथळा आणला म्हणून तलाठी मृणाल सोनवणे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.