पाचोरा शहरातील घटना
पाचोरा (प्रतिनिधी) – येथे जारगाव चौफुली रस्त्यावर एक चोरटा चोरी करून पळत असताना गस्तीवरील पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला त्याने लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी दिलीप पाटील आणि पोलीस नाईक सचिन पवार हे शुक्रवारी १८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गस्तीवर होते. संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी (वय-२२, रा. मलकापूर) हा जारगाव चौफुली परिसरात चोरी करून पळत होता. दरम्यान पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले.
दरम्यान संशयित आरोपी अशोकसिंग बावरी याने पळून जाण्याच्या इराद्याने पोलीस कर्मचारी सचिन पवार यांच्यावर लोखंडी टॉमीने मारहाण करून गंभीर दुखापत केली. यासंदर्भात पोहेकॉ दिलीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी अशोकसिंग ईश्वरसिंग बावरी याच्या विरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ करीत आहे.