जळगाव तालुक्यातील शिरसोली येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली प्र. न. येथील साईबाबा मंदिर परिसरात ११ केव्हीची इलेक्ट्रिक तार तुटून एक गाय दगावली तर दुचाकीसह घरातील इलेक्ट्रिक मीटर जळाले. ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित वीजपुरवठा खंडित केल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली.
शिरसोली गावांसह गावठाण भागाला ११ केव्ही दाबाने वीजपुरवठा केला जातो. मंगळवारी दुपारी २ वाजता पाऊस सुरू असताना अचानक कुन्हाडदा रस्त्यावरील साईबाबा मंदिर चौकातील इलेक्ट्रिक पोलवरील ११ केव्ही क्षमतेची वीज तार तुटून एकनाथ भादू अस्वार यांच्या अंगणात पडली. अंगणात असलेली खाट व दुचाकीचे (एम.एच.१९ बी. पी. (२६८२ ) नुकसान झाले. जमीन ओली असल्याने दूरवर बांधलेली योगेश बुंधे यांच्या मालकीच्या गाईलाही विजेचा धक्का लागुन तिचा दुर्दैवाने मृत्यू झाला.
तार तुटली तेव्हा मोठा जाळ होऊन आवाज झाल्याने घरातील नागरिक आले. तार तुटल्याबाबत रामकृष्ण काटोले, पोलिस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी महावितरणचे कर्मचारी खुर्शीद जमादार यांना फोनवर कळविले. जमादार यांनी वीजपुरवठा करणाऱ्या मुख्य शाखेला माहिती देऊन वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितल्याने मोठी दुर्घटना टळली. घटनास्थळी कनिष्ठ अभियंता जयेंद्र सपकाळे, अमरसिंग बंजारा, राजू बारी, योगेश तळेले, भिमा बारी, जुबेर पिंजारी यांनी लागलीच धाव घेतली. तलाठी सारिका दुरगुडे व भगवान बुंधे यांनी मृत्यू झालेल्या गाईचा पंचनामा केला.
घटना घडण्याच्या दोन मिनिटे आधी योगेश बुंधे यांनी आपल्या गायीला चारापाणी केले. त्यावेळी पाऊस सुरु झाल्याने ते घराकडे निघाले आणि तेवढ्यात शॉक लागून गायीचा मृत्यू झाला. या घटनेत योगेश बचावले.