औरंगाबाद (वृत्तसंस्था) – औरंगाबाद शहरात 16 मजुरांवर काळाने घातला आहे. रेल्वे रुळावर झोपलेल्या परप्रांतीय मजुरांना मालगाडीने चिरडले आहे. औरंगाबादच्या करमाडजवळ ही घटना घडली. यामध्ये 16 मजूर ठार झाले असून काही कामगार जखमी झाले आहे. सकाळी 5-6 च्या सुमारास हा अपघात झाला. आता या मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मजुरांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे.
लॉकडाऊनमुळे जालन्यात अडकलेले मजूर रेल्वे रुळावरुन औरंगाबादच्या दिशेने पायी येत होते. दरम्यान रात्री थकल्यावर रेल्वे बंद असल्याचा विचार करुन मजुरांनी रुळावरच झोप घेतली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे परप्रांतीय मजूर मध्य प्रदेशातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. करमाड पोलीस दुर्घटनास्थळी अधिक तपास करत आहेत.
परराज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने 16 जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान परराज्यातील अनेक मजूर महाराष्ट्रात अडकलेले आहे. त्यांना बस आणि विशेष ट्रेनच्या माध्यमातून आपापल्या गावी नेण्याची व्यवस्था केली जात आहे. यासाठी अनेक रेल्वेगाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र याच काळात औरंगाबादेतून ही दुर्दैवी घटना समोर आली.