जळगाव तालुक्यातील विदगाव येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील विदगाव येथील एका तरुणाने पुलावरून तापी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना रविवारी ११ जून रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. सुमारे एक तास त्याचा शोध घेतल्यावर मृतदेह मिळून आला आहे. तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पुनमचंद दगडू कुंभार (वय ३५, रा. विदगाव, ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो परिवारासह विदगाव येथे राहतो. वीटभट्टीवर तो व त्याची पत्नी दोघे मजुरी करतात. रविवारी तो पुलाजवळ आला असताना त्याने अचानक पुलावरून नदीत उडी मारली. ग्रामस्थांनी धाव घेतली. त्याचा नदीत शोध घेतला. एक तासाने त्याचा मृतदेह मिळून आला. तत्काळ त्याला पोलीस व नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. मृतदेह शोधण्याकामी गुलशन नाईक, जनार्दन कोळी, कैलास झळके, अशोक कुंभार, जनार्दन कुंभार आदींनी सहकार्य केले.
तालुका पोलीस स्टेशनला माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आत्महत्येप्रकरणी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत पुनमचंद यांचे पश्चात पत्नी, २ मुले, आई, वडील, २ भाऊ, १ बहीण असा परिवार आहे. रुग्णालयात नातेवाईक, मित्र यांनी गर्दी केली होती.