चोपड्यात हिरा कॉटन जिनिंग येथील घटना सीसीटीव्हीत कैद
चोपडा (प्रतिनिधी) : शहरापासून जवळ असलेल्या हिरा कॉटन जिनिंग येथे रविवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत ८ लाख १७ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरटे अवघ्या पाचच मिनिटात रक्कम चोरून बाहेर पडले असून घटना सीसीटीव्ही कॅमेरात् कैद झाली आहे. चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनील तिलकचंद जैन (वय ५५, रा. टाटिया कॉम्प्लेक्स, चोपडा) या व्यापाऱ्याने फिर्याद दिली आहे. रविवारी ४ जून रोजी पहाटे ३ वाजून ५ मिनिटांनी अज्ञात चार आ समान इसमांनी यावल रस्त्यावरील हिरा कॉटन जिनिंग या त्यांच्या कंपनीत प्रवेश केला. तेथे कार्यालयाच्या काचेचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथे कापूस खरेदी विक्री करिता ठेवलेली ८ लाख १७ हजार रुपयांची रक्कम चोरट्याने चोरून नेली आहे.
अवघ्या पाच मिनिटात चोरी करून चोरटे बाहेर आले असल्यामुळे हे चोरटे माहितगार असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून डीवायएसपी कृषीकेष रावले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती जाणून घेतली.
दरम्यान, सुनील जैन यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक के. के. पाटील करीत आहेत.