जळगाव स्टेट बँकेवरीलं दरोड्यातील आरोपी अटकेत
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या झालेल्या बँक लुटीचा उलगडा झाला आहे. निलंबीत फौजदार असलेला मेव्हणा आर्थिक अडचणीत असल्याने त्याला आयडियाची कल्पना सांगत स्टेट बँकेतील शिपाई शालकाने त्यांचा हा गेमप्लान यशस्वी करून काशीबाई कोल्हे शाळेबाजूची स्टेट बँक लुटली असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
बँकेत प्रत्यक्ष ही लूटमार करून सोने व रोख रैक्कम पळवून नेणाऱ्या दोन्ही आरोपींनी अगदी ठरल्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे निलंबित फौजदार शंकर जासक याच्या घरी पोहोचती केल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, चाळीसगावचे अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांनी या खळबळजनक बँक लुटीचा गुन्हा शनीपेठ पोलीस ठाण्यात दाखल झाल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना सोबत घेत तपासाची चक्रे फिरवली होती. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सतीश कुलकर्णी व आप्पासाहेब पवार, पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचा या तपास पथकात सहभाग होता. पोलिसांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिका माता मंदिर शाखेचे व्यवस्थापक व बँकेच्या अन्य कर्मचाऱ्यांची हरतर्हेने चौकशी केल्यावर सुगावा लागला. याच बँकेतील शिपाई मनोज सूर्यवंशी याच्यावर संशय आल्याने त्याची कसून चौकशी झाली. त्याने पोलिसांना दिलेल्या कबुली जबाबात म्हटले आहे की माझा मेव्हणा शंकर जासक (निलंबित फौजदार, रायगड) व त्याचे वडील रमेश जासक यांच्या संगनमताने आम्ही हा कट रचला होता. पोलिसांच्या पथकाने कर्जत येथे जाऊन निलंबित फौजदार शंकर जासक याला ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी स्पष्ट झाले की रायगड पोलीस दलातील निलंबित फौजदार जासक हा ऑक्टोबर २०२१ पासून नोकरीवर गैरहजर आहे. शंकर जासकच्या पत्नीचा भाऊ मनोज सूर्यवंशी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कालिंका माता मंदिर शाखेत करार तत्वावर शिपाई म्हणून काम करतो. या तिघांनी हा बँक लुटीचा कट रचला होता. जळगावातील बँक लुटीतील रक्कम आणि सोने पोलिसांनी कर्जत येथून जप्त केले आहे.