रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथे शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटली असून अशोक रुपचंद बोरनारे (वय ६५, रा. कुसूंबा बुद्रुक) असं मृताचे नाव आहे. रावेर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

तालुक्यातील रसलपूर ते केऱ्हाळे बुद्रुक रस्त्यालगतच्या शेतशिवारात गट नं. १५६ या शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता होता. मयत अनोळखी असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. याप्रकरणी शिवसेनेचे तालुका उपप्रमुख नितीन भगवान महाजन यांच्या खबरीवरून रावेर तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
कुसूंबा बुद्रुक गावातील महेंद्र अशोक बोरनारे यांचे वडील अशोक बोरनारे हे गेल्या काही दिवसांपासून घरून बेपत्ता होते. सर्वत्र शोध घेऊनही ते आढळून येत नसल्याने महेंद्र यांनी बेपत्ता वडील अशोक बोरनारे यांचा शोध लागावा म्हणून तक्रारीसाठी पोलीस स्टेशन गाठले. याठिकाणी तक्रार नोंदविण्यापूर्वी पोलिसांनी विहिरीत मिळून आलेल्या मृतदेहाबाबतची माहिती महेंद्र बोरनारे यांना दिली. महेंद्र बोरनारे यांनी संबंधित मयताची ओळख पटविली असता, ते त्याचे वडीलच असल्याचे निष्पन्न झाले.
वडिलांचा मृतदेह पाहून महेंद्र यांनी हंबरडाच फोडला. अशोक बोरनारे हे दीर्घ आजाराने त्रस्त होते. यापूर्वीही ते आजाराला कंटाळून घरातून निघून गेले होते, मात्र त्यानंतर ते पुन्हा घरी परतले होते. मात्र यंदा गेले ते परत आलेच नाही. कुटुंबियांकडून अशोक बोरनारे यांचा शोध सुरू असताना थेट मृत्यूची बातमी मिळाली. ज्या आजाराने बोरनारे हे त्रस्त होते, तो आजार आणखीनच बळावला होता आणि त्यातून त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.









