जळगाव (प्रतिनिधी) – केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचा निकाल आज (दि.२३) जाहीर झाला. त्यात जळगाव येथील अंकित विजयसिंग पाटील ने देशपातळीवर (AIR) ७६२ वा रँक मिळविला आहे. अंकीत हा जैन इरिगेशन कंपनीमध्ये सिनियर मॅनेजर असलेले विजयसिंग आणि एम.जे. कॉलेजमधील प्राध्यापिका डॉ. संगीता पाटील यांचा मुलगा आहे. आयआयटी गोल्ड मेडलिस्ट तसेच ‘आयआयटीबीआयटी’ या पुस्तिकेची लेखिका सुकन्या पाटील यांचा तो धाकटा भाऊ आहे. अंकितचे मुंबई आयआयटी येथून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवीचे शिक्षण झालेले असून सद्या IIT दिल्ली येथे ‘मास्टर इन पब्लिक पॉलिसी’चे शिक्षण घेत आहे.
पाटील कुटुंबीय हडसन (ता. पाचोरा) येथील मूळ रहिवासी आहे. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे तीनही टप्पे यशस्वीरीत्या पार करत अंकित पाटीलने जळगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्यामुळे अंकित पाटील व सर्व पाटील कुटुंबियांचे शहरवासियांकडून कौतुक व अभिनंदन होत आहे. जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांनी देखील अंकीतचे अभिनंदन केले.