जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील शिवाजीनगर उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शनिवारी ६ मे रोजी सायंकाळी ७ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रणजीत हिरालाल जोहरे (वय-२२, रा. भुरे मामलेदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे. रणजीत जोहरे हा तरूण छत्रपती शिवाजी नगरात आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. त्याचा मित्र तुषार याला हाताला जखम झाल्यामुळे रणजीत हिरालाल जोहरे आणि त्याच्यासोबत गणेश नावाचा मित्र असे तिघेजण २२ एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच १९ बीई ४४४५) ने उपचारासाठी दवाखान्यात जाण्यासाठी निघाले. उड्डाणपुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या एका दुचाकीने जोरदार धडक दिली. या धडकेत रणजीत जोहरे यांच्यासोबत इतर काही मित्र जखमी झाले होते. यात रणजीतला अधिक दुखापत झालेले होती. त्यामुळे त्याला तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला मुंबईला हलविण्यात आले. परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी शनिवार ६ मे रोजी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय करीत आहे.