जळगावातील मासूमवाडी येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) : मनपाची २० रूपयांची बाजार शुल्क पावती फाडण्याच्या कारणावरून नकार दिल्याच्या कारणावरून एकाने विक्रेत्याला फायटरने तोंडासह छाती, पोटावर मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना उघडकीला आली आहे. हि घटना बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास मासुमवाडी भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेख रफीक शेख हमिद मणियार (४०,रा.मासुमवाडी) असे जखमी विक्रेत्याचे नाव आहे. शेख हे हातगाडीवर कटलरी साहित्य विक्रीचा व्यवसाय करतात. बुधवारी सकाळी ९ वाजता ते हातगाडी घेवून व्यावयासासाठी घरातून बाहेर निघाले. रस्त्यात त्यांना मनपाची २० रूपयांची बाजार शुल्क पावती फाडणारा व्यक्ती भेटला. त्याने त्यांना पावती फाडण्यास सांगितली. पण, मी आत्ताच घरातून बाहेर निघालो असून पावती देवून द्या, नंतर पैसे घेवून जा असे शेख यांनी सांगितले.
मात्र, त्या व्यक्तीने आत्ताच पावती फाड असे सांगितल्यानंतर शेख त्यांनी त्यास नकार दिला. त्याचा राग येवून शुल्क पावती फाडणाऱ्या व्यक्तीने बँगेतून फायटर काढत शेख यांच्या तोंडासह छाती व पोटावर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. शेख यांनी लागलीच पोलिस ठाणे गाठले. मात्र, त्यांच्या तोंडातून रक्तस्त्राव होत असल्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजेंद्र उगले करीत आहेत.