जळगाव ( प्रतिनिधी ) – १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वित्त विभागाने जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 2022-23 भविष्य निर्वाह निधीचा वार्षीक हिशोब हा त्वरीत उपलब्ध व्हावा या दृष्टीने अथक प्रयत्न करून काही मिनिटात भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारा १ मे रोजी जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. डॉ. पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे कामकाज सोयीचे होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. त्याच दृष्टीने भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी यांचे सन २०२२-२३ शिल्लकेचे उतारे जि.प संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. संबधित कर्मचारी यांना दि.१ मे २०२३ पासून जिल्हा परिषदेच्या http://zpjalgaon.gov.in/ या संकेतस्थळावर जावून एका क्लिकवर भ.नि.नि क्रमांकानुसार हे उतारे बघता येणार आहेत. व त्यांची प्रिंट देखील काढता येणार आहे.
मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. बाबुलाल पाटील, उपमुख्य व लेखा व वित्त अधिकारी श्री. राजेंद्र खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून सदर लेखे पूर्ण करण्यासाठी लेखाधिकारी श्री. दिलीप वानखेडे, कनिष्ठ लेखाधिकारी श्री. विकास रुळे व सर्व भविष्य निर्वाह निधी शाखेतील कर्मचारी यांनी अल्प कालावधीत परिश्रम घेतले.
संबधित सन २०२२-२३ चे खाते उता-यांमध्ये काही दुरूस्ती आढळल्यास एक महिन्याच्या आत विभाग प्रमुखांमार्फत अर्थ विभागाच्या भविष्य निर्वाह निधी शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. बाबुलाल पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांना केले आहे.