मुंबई (वृत्तसंस्था) – राज्यभरात आज कोरोनाचे तब्बल 841 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या 841 रुग्णांपैकी एकट्या मुंबईतील 635 रुग्णांचा समावेश आहे. मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णांची संख्या संपुर्ण महाराष्ट्रासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. यामागचे कारण म्हणजे मुंबईतल्या धारावी परिसरात कोरोनाचा शिरकाव झाल्यानं मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान आज राज्यभरात कोरोनानं 34 जणांचा बळी घेतला आहे.
आजच्या 841 रुग्णांमुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 15 हजार 525 वर गेला आहे. यातील 9 हजार 758 रुग्ण मुंबईतले आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे आज 354 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आतापर्यंत राज्यातील 2819 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यभरात कोरोना तपासणीला वेग आला आहे, त्यामुळं कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत असल्याची माहिती मिळतेय, तसेच कोरोना प्रसाराचा वेग मंदावला असून कोरोनापासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे.