जळगाव (प्रतिनिधी) – येथील बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” अंतर्गत आज दि. २२ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जुने जळगाव येथील येथील रथ चौक येथून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रेला हजारो समाजबांधवांची उपस्थिती राहणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुभाषिक ब्राह्मण संघ “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” साजरा करीत आहे. जन्मोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी १० वाजता भगवान श्री परशुराम पूजन जुने श्रीराम मंदिर, रथ चौक येथे होणार आहे. यावेळी स्वाती – संजय कुलकर्णी व सौ. संतोष – शिवप्रसाद शर्मा हे दोन दाम्पत्य पूजन करतील. दुपारी ४ वाजता भगवान परशुराम रथयात्रा प्रारंभ होईल. श्रीराम मंदिर संस्थानचे गादीपती हभप मंगेश महाराज जोशी, जिल्हाधिकारी अमन मित्तल, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहे.
दुपारी ५ वाजता भव्य शोभायात्रेला सुरुवात होण्याआधी नेताजी सुभाष चौकात भवानी मंदिर येथे शोभायात्रेचे पूजन होईल. पंडित महेश त्रिपाठी, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, अॅड. सुशील अत्रे, अशोक साखरे, अशोक वाघ, प्रशांत जुवेकर, पियुष रावळ यांचे हस्ते पूजन होणार आहे. यावेळी सकल समाजाचे सर्व अध्यक्ष तथा प्रमुख देणगीदार उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हजारो समाजबांधवांच्या उपस्थितीत शोभायात्रा प्रारंभ होईल. संध्याकाळी ७ वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत भगवान परशुराम रथ पूजन जल्लोषात दाणा बाजारात होणार आहे.
शोभायात्रेत समाजबांधव पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहे. तसेच पारंपरिक ढोलताशे, लेझीम पथकाच्या तालावर जयंती साजरी करण्यात येणार आहे. समाजबांधवानी वेळेवर उपस्थिती द्यावी असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर, महिला मंडळाच्या अध्यक्ष मनीषा दायमा यांनी केले आहे.