जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील नुतन मराठा महाविद्यालयाजवळ दोन दुचाकींची समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हमीद शेख मोहम्मद शफी (वय-३८) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहायला आहे. बुधवार १९ एप्रिल रोजी हमीद शेख हा त्याच्या दुचाकीने नुतन मराठा महाविद्यालयाजवळून जात असतांना समोरून अज्ञात दुचाकीधारकाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात हमीद शेख हा गंभीर जखमी झाला. त्याला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तसेच त्याच्या दुचाकीचेही नुकसान झाले. या अपघात प्रकरणी गुरूवार २० एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात दुचाकीधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संगिता खांडारे करीत आहे.