जळगाव (प्रतिनिधी) – येथील समस्त ब्राह्मण समाज तथा बहुभाषिक ब्राह्मण संघातर्फे “श्री परशुराम जन्मोत्सव २०२३” अंतर्गत आज रविवार दिनांक १६ एप्रिल रोजी रक्तदान शिबिर आणि भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला समाजातील शेकडो नागरिकांची उपस्थिती लाभणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बहुभाषिक ब्राह्मण संघ श्री परशुराम जन्मोत्सव २०२३ साजरा करीत आहे. जन्मोत्सवामध्ये १६,२० व २२ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी १६ एप्रिल रोजी सकाळी ८ ते १२ या वेळेमध्ये भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर आकाशवाणी चौकातील दिवंगत बलदेव उपाध्याय फाउंडेशन या ठिकाणी पार पडणार आहे.
शिबिरासाठी शेकडो नागरिकांनी नोंदणी केली आहे. इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या सहकार्याने हे शिबिर होईल. रक्तदान शिबिरासाठी केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अंमळकर, उद्योजक सुशील आसोपा, शासकीय कंत्राटदार सतीश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जन्मोत्सवात रविवारी संध्याकाळी ५ वाजता भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
रॅलीला सुरुवात छत्रपती संभाजी राजे चौक, महाबळ परिसर येथून होईल. प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्रनाथ मिश्रा, मिलिंद थत्ते, वास्तुशल्यविशारद नितीन पारगावकर, देवेंद्र भालेराव उपस्थित राहणार आहेत. रॅली महाबळ कॉलनी चौक, सागर पार्क परिसर, आकाशवाणी चौक, रिंग रोड, शिवतीर्थ चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे विद्यालय, नेताजी सुभाष बाबू चौक, बेंडाळे चौक, नेरी नाका या मार्गाने जाऊन पांजरापोळ गोशाळा येथे समारोप होणार आहे.
समाज बांधवांनी पारंपारिक वेशभूषामध्ये कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी असे आवाहन बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष डॉ. अजित नांदेडकर आणि महिला मंडळाचे अध्यक्ष मनीषा दायमा यांनी केले आहे.