जळगाव (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे ८ एप्रिल रोजी अयोध्याला जाणार आहे. या दौऱ्यात शिंदे यांच्यासोबत जिल्यातील दोन्ही मंत्री अर्थात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि भाजपचे नेते राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन हेदेखील सोबत जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. दोन्ही मंत्री सध्या मुंबईत असल्याची माहिती मिळाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ८ एप्रिल रोजी आपल्या शिष्टमंडळासह दोन दिवसांचा उत्तर प्रदेश दोरा करणार आहेत. या दौऱ्यात ते आयोध्याला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत त्यांच्या पक्षाचे काही मंत्री यांचेसह भाजपचे नेते गिरीश महाजन, आमदार प्रा.राम शिंदे, आमदार आशिष शेलार, मोहित कंबोज यांचेसह आदी भाजप नेत्यांचा सहभाग असणार आहे. या दौऱ्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्यासमवेत महाराष्ट्राचे शिष्टमंडळ आयोध्येतील राम मंदिर उभारणी कामाची पाहणी करणार आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे शिष्टमंडळ अयोध्येतील विविध भागांना ९ रोजी भेटी देणार आहेत. अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी शिवसेनेच्या वतीने धनुष्यबाणाची महापुजा केली जाणार आहे. त्यानंतर महापूजा केलेल्या हा धनुष्यबाण महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात नेला जाणार आहे. अगामी निवडणूकांच्या दृष्टीने शिवसेनेकडून जोरदार मोर्चेबांधणी हाती घेतली आहे.