जळगाव (प्रतिनिधी) – येथील प्रभाग १६ अ चे नगरसेवक भगत रावलमल बालाणी यांनी आपल्या नगरसेवक पदाचा आयुक्तांकडे मंगळवारी सकाळी ११ वाजता राजीनामा दिला आहे. राजीनामापत्रात त्यांनी, स्वेच्छेने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. मात्र, काही दिवसात ते अपात्र होतील म्हणून त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा रंगत आहे.
भाजपा गटनेता भगत बालाणी यांनी मंगळवारी सकाळी आयुक्तांकडे आपला राजीनामा सोपविला आहे. राजीनामा पत्रात, मी प्रभाग क्रमांक १६ अ मधून निवडून आलो आहे. मी माझ्या नगरसेवक पदाचा स्वेच्छेने राजीनामा देत आहे, एवढाच उल्लेख केलेला आहे.
भगत बालाणी यांच्यासह पाच नगरसेवकांविरोधात अपात्रतेची तक्रार जळगाव न्यायालयात दाखल करण्यात आलेली होती. वादी म्हणून प्रशांत नाईक आहेत. तसेच, भगत बालाणी यांच्या जात प्रमाणपत्रावर हरकत घेणारी याचिका चेतन शिरसाळे यांनी दाखल केली होती. त्यावरही काही दिवसात निकाल लागण्याची शक्यता आहे. अपात्र होण्याच्या भीतीमुळेच त्यांनी राजीनामा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.