मुंबई (प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजना राबविण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही सकारात्मक असल्याने या संपातून माघार घेत असल्याची घोषणा राज्यातील प्राथमिक शिक्षकांची शिखर संघटना असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघा’ने जाहीर केली आहे. जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी सरकारला वेळ देण्यास संघाची तयारी असल्याचे सांगत या संपातून माघार घेत असल्याची घोषणा प्रथिमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात यांनी केली.
संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष संभाजी थोरात तसेच आरोग्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आज विधानभवनात पार पडली. या बैठकीत त्यांनी संघटनांना शासनाने आपली भूमिका समजावून सांगितली.
जुनी पेन्शन योजना राबविण्यासाठी शासन सकारात्मक असून शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे तत्व सरकार म्हणून आपल्याला मान्य असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत सांगितले. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अभ्यास समिती स्थापन करण्याची गरज त्यांनी या संघटनांना समजावून सांगितली. ही समिती येत्या दोन दिवसात जाहीर करण्यात येणार असून या समितीमध्ये सचिव दर्जाचे प्रशासकीय अधिकारी आणि शिक्षक संघटना, आरोग्य संघटनेचे पदाधिकारी देखील तसमाविष्ट असतील असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.