जळगाव (प्रतिनिधी) – महानगरपालिकेने गोलाणी मार्केटला सोयीसुविधा न पुरविता मालमत्ता करात भरमसाठ वाढ केली आहे. ती वाढ मागे घ्य्यावी तसेच, गाळा हस्तांतरण फी पूर्ववत करारानुसार करावी, अशी मागणी गोलाणी मार्केटच्या व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी मनपाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. प्रसंगी, मार्केटमध्ये व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी करीत मनपाच्या धोरणाचा निषेध केला.
निवेदनात म्हटले आहे की, मनपाने घरपट्टीबाबत केलेल्या करारनाम्याचे उल्लंघन केलेले आहे. भरमसाठ कर वाढवून व्यापाऱ्यांवर अन्याय केलेला आहे. व्यापाऱ्यांचे जगणे मुश्किल झाले असून वैद्यकीय खर्च भागविणे कठीण आहे. गोलाणी मार्केटमध्ये स्वच्छता नाही, लिफ्ट खराब झाल्या आहेत. अशा अनेक समस्या असतानाही करवाढ केलेली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी ‘केसरीराज’ ला दिली आहे.