जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव तालुक्यातील कठोरा गावाजवळ शौचालयास जात असलेल्या पादचारी प्रौढास रस्ता पार करतांना अज्ञात दुचाकीने धडक दिल्याने पादचारी ठार झाला होता, तर एक जखमी झाल्याची घटना १४ जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघातप्रकरणी रविवार, २२ जानेवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास तालुका पोलिसात दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कठोरा येथे वासुदेव श्रावण सपकाळे (वय – ५५) हे वास्तव्यास होते. १४ जानेवारी रोजी वासुदेव सपकाळे हे गावातील समाधान भागवत शिंदे यांच्यासोबत शौचालयाला जात होते, यादरम्यान गावाजवळ जळगाव भोकर रोडवर रस्ता पार करत असतांना (एम.एच. १९ डी.जी.९८६३) या क्रमाकांच्या भरधाव जात असलेल्या दुचाकीस्वाराने वासुदेव सपकाळे व समाधान शिंदे या दोघांना धडक दिली. यात वासुदेव सपकाळे यांचा मृत्यू झाला आहे, तर समाधान शिंदे (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातप्रकरणी रविवार, २२ जानेवारी रोजी मयत वासुदेव सपकाळे यांचा मुलगा पुरूषोत्तम सपकाळे याने तालुका पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन (एम.एच. १९ डी.जी.९८६३) या क्रमाकांच्या दुचाकीवरील अनोळखी दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल ईश्वर छगन लोखंडे हे करीत आहेत.