जळगाव(प्रतिनिधी) – नशिराबाद गावात एका भागात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत बुधवार ७ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता एकावर नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावातील एका भागात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह राहायला आहे. मंगळवार ६ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना यावल तालुक्यातील अट्रावल येथील योगेश अरुण देशमुख याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला पळवून नेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही. अखेर बुधवार ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता नशिराबाद पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी योगेश अरुण देशमुख रा. अट्रावल, ता. यावल याच्या विरोधात नशिराबाद पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.