जळगाव ( प्रतिनिधी ) – सासऱ्याच्या तेराव्याला आलेल्या जावयाच्या अपघातात मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील आसोदा गावाजवळ घडली आहे. या संदर्भात शुक्रवारी २ डिसेंबर रोजी सायंकाळी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.श्रीकृष्ण दत्तात्रय वाणी (वय-५०,रा. विटनेर, ता.जि. जळगाव) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव असून सुरेखा श्रीकृष्ण वाणी हे गंभीर जखमी झालेले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जळगाव तालुक्यातील विटनेर येथील रहिवासी श्रीकृष्ण दत्तात्रय वाणी (वय – ५०) हे आपल्या पत्नी सुरेखा श्रीकृष्ण वाणी यांच्यासह राहायला आहे. सुरेखा यांचे वडील मयत झाले होते. त्यांच्या तेराव्याला कार्यक्रमाला श्रीकृष्ण वाणी हे पत्नी सुरेखा वाणी यांच्यासह भादली येथे कार्यक्रमासाठी आले होते. शुक्रवार 2 डिसेंबर रोजी दुपारी तेराव्याचा कार्यक्रम आटोपून श्रीकृष्ण वाणी हे पत्नी सुरेखा वाणी यांच्यासह दुचाकीने विटनेर येथे निघाले होते. भादली गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ त्यांनी पेट्रोल भरून पुढे जाण्यास निघाले. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास पेट्रोल भरून रोडक्रॉस करत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीवरील दोघांनी श्रीकृष्ण वाणी यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत श्रीकृष्ण वाणी यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सुरेखा वाणी या गंभीर जखमी झालेल्या आहेत. अपघात झाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. यावेळी नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. या संदर्भात जळगाव तालुका पोलिसात अज्ञात वाहनचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.