पोलिसांची ताफा घटनास्थळी दाखल ; शासकीय रुग्णालयात गर्दी
जळगाव (प्रतिनिधी) : शहरात खुनाच्या घटनांचे सत्र थांबून महिना होत नाही तोवर पुन्हा एकदा दिवाळीच्या काळात मंगळवारी २५ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास तांबापुरात कुटुंबावर हल्ला झाला. त्यात तरुण मुलाचा वर्मी घाव लागल्याने खून झाला तर इतर पाच जण जखमी झाले आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचा तपास सुरू झाला आहे. दरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गर्दी झाली आहे.
प्रदीप सिंग यांचे कुटुंब डी मार्ट समोरील तांबापुरा भागात राहतात. मंगळवारी २५ रोजी ते घराजवळ असताना अचानक अज्ञात लोकांनी येऊन पूर्ववैमानस्यातून त्यांच्यावर चाकू आणि इतर अज्ञात शस्त्रांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात संजय सिंग प्रदीप सिंग (वय २१) याला छातीमध्ये डाव्या बाजूने चाकू खुपसला गेल्याने वार वर्मी लागला. तर त्याचा सख्खा भाऊ करण सिंग (वय १७), वडील प्रदीप सिंग आयात सिंग (वय ४०), नातेवाईक बग्गा सिंग (वय २८), बलवंत सिंग (वय ६०) यांनाही मार बसला आहे.
यात करण सिंग व बग्गा सिंग यांना चाकू लागला असून प्रदीप सिंग व बलवंत सिंग यांच्या डोक्यावर मार लागला आहे. घटनास्थळी पोलिसांना माहिती मिळताच ते दाखल झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी तपासणी झाल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संजय सिंग प्रदीप सिंग याला मयत घोषित केले. तर इतर चौघांवर उपचार सुरू आहेत.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह एमआयडीसी पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी व सुरक्षा बलाची एक गाडी दाखल झाली. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात देखील गर्दी झाल्याने तेथे पोलिसांनी उपस्थिती दिली.
घटनास्थळी झालेला तणाव निवळण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते. दरम्यान या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नवीन पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यापुढे हे खून सत्र थांबवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत.त्यांनी पदभार घेऊन चार दिवस होत नाही तोच खुनाच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले आहे.