जळगाव ( प्रतिनिधी ) – असोदा रेल्वेगेटजवळ रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत चालकाने बस खड्ड्यात आदळल्यामुळे बसमधील प्रवाशाला मार लागून वृद्ध प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून , जळगाव तालुक्यातील असोदा येथील दत्तम मंदिराजवळ मधुकर धोंडू सोनार (वय-६५) हे वृद्ध वास्तव्यास असून ते ८ ऑक्टोबर रोजी रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास असोदा येथून जळगावला येण्यासाठी (एमएच २० बीएल २९४०) क्रमांकाच्या बसमध्ये मागच्या सीटवर बसले होते. बस चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत बस भरधाव वेगाने चालवित असतांना बस ही असोदा रेल्वेगेटजवळी स्पीड ब्रेकरच्या खड्ड्यात आदळली. यामुळे बसमध्ये बसलेले वृद्ध मधुकर सोनार यांना मुक्का मार लागून त्यांच्या मणका व कंबरेजवळ गंभीर दुखापत होवून ते जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरुन सोमवारी १० ऑक्टोबर रेाजी दुपारी ३ वाजता बस चालक दिलीप रामचंद्र कोळी यांच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार साहेबराव पाटील करीत आहे.