वीज कामगार महासंघाच्या लढ्याला यश ; अधिकाऱ्यांचे आभार मानून केला जल्लोष
जळगाव (प्रतिनिधी) – येथील महावितरण कंपनीचे कर्मचारी राजेंद्र पुंडलिक सोनवणे आणि कैलास जगन्नाथ कोळी यांना कंपनीने अन्यायकारक पद्धतीने अनुसूचित जमातीच्या संवर्गात गणना करून त्यांना अतिरिक्त ठरवण्याचे आदेश निर्गमित केले होते. त्याविरुद्ध सलग दोन वर्षे लढा दिल्यानंतर त्यांना न्याय मिळाला आहे. त्यांना अधिसंख्य ठरवण्यात आल्याचा आदेश नुकताच रद्द करून दोघेही नियमित कर्मचारी असल्याचे जाहीर करण्यात आले. याबद्दल वीज कामगार महासंघातर्फे अधिकाऱ्यांचे आभार मानून जल्लोष करण्यात आला.
महावितरणचे कर्मचारी राजेंद्र पुंडलिक सोनवणे आणि कैलास जगन्नाथ कोळी हे कंपनीत प्रकल्पग्रस्त आणि स्वेच्छानिवृत्तीच्या योजनेनुसार नोकरीला लागलेले आहे. तरीही त्यांना जळगाव विभागाच्या कार्यालयाने अनुसूचित जमातीच्या संवर्गात गणना करून अतिरिक्त ठरवण्याचे आदेश दोन वर्षांपूर्वी दिले होते. याबाबत सातत्याने प्रशासनाला अर्ज देऊन हा आदेश रद्द होण्यासाठी मागणी करण्यात आली होती.
महाराष्ट्र विज कामगार महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील अनेक वेळा अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय देण्याची विनंती केली होती. मात्र प्रशासन वेळ काढू धोरण करीत असल्याचे लक्षात आल्याने संघटनेने वेळोवेळी उपोषणाचा इशारा दिला होते. दरवेळेला प्रशासन वेळ मारून व खोटे आश्वासन देऊन उपोषण तात्पुरते स्थगित करीत होते.
यावेळी मात्र वीज कामगार महासंघाने १४ सप्टेंबर रोजी उपोषण सुरू करू असा इशारा दिला. त्यानंतर मात्र जळगाव विभागाच्या प्रशासनाने तात्काळ राजेंद्र सोनवणे व कैलास कोळी यांना अधिसंख्य ठरविण्यात आल्याचा आदेश रद्द केला. तसेच दोघेही कर्मचारी नियमित असल्याचे जाहीर केले. त्यामुळे वीज कामगार महासंघाने अधिकाऱ्यांचे आभार मानून जल्लोष केला.
दोघा कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी महासंघाचे पदाधिकारी सुरेश सोनार, सुभाष भावसार, सचिन पाटील, प्रवीण अमृतकर, मोहन गारुंगे, ज्ञानेश्वर पाटील, किशोर पाटील, योगेश मराठे, आर. आर. चौधरी, विलास वाघ यांनी मार्गदर्शन केले. विभागीय अध्यक्ष भागवत कोळी, कमलेश सोनवणे यांनी पाठपुरावा करून संघर्षाची भूमिका कायम ठेवली. तर सचिन लाडवंजारी, महेंद्र कोळी, विकी पाटील व इतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. महावितरण कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी अरुण शेलकर आणि नेमिलाल राठोड यांनी याबाबत सहकार्य करून प्रश्नांची सोडवणूक केली.