जळगाव (प्रतिनिधी) – मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे एलसीबीचे तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर अखेर जिल्हापेठ पोलीस स्टेशनला विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आधी कंट्रोल येथे बदलीनंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली तर आता त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, एलसीबीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचे पडसाद संपूर्ण जिल्हा भरात उमटल्यानंतर त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले असून त्यांच्या बडतर्फीची आज विविध संघटनांकडून निवेदन देऊन मागणी करण्यात आली . बांधकाम व्यावसायिक विनोद पंजाबराव देशमुख यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि, ते अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱयांना ओळखतात. त्यांची आणि बकाले यांनी अनेक कार्यक्रमांमधून भेट झाली असून ते दोघे एकमेकांना ओळखतात . एका व्हाटसअप ग्रुपवर 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठिक 4 वाजता ग्रुपवर आलेली ऑडीओ क्लीप मी डाऊनलोड केली. ती 3.13 मिनीटांची असून ती क्लिप मी ऐकली असता, त्यामध्ये एक जबाबदार शासकीय नोकर असलेले किरणकुमार बकाले हे त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार सफौ. अशोक महाजन यांच्याशी कामानिमीत्त चर्चा करत असतांना मराठा समाजाबददल आक्षेपार्ह, घृणास्पद व स्त्रियांना लाज वाटेल असे बोलून मराठा समाजातील सर्व स्त्री पुरुष व लहान थोरांचा अपमान करून जातीय तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केलेले आढळून आले.
बकाले हे सरकारी नोकर व जबाबदार पदावर असतांना आपल्या सहकारी अंमलदारांशी फोनवर बोलतांना ‘मराठा समाजाबददल’ अतिशय घृणास्पद व आक्षेपार्ह वक्तव्य करून दोन समाजामध्ये द्वेष भावना वाढवण्याचा प्रयत्न केला व असे वक्तव्यामुळे सार्वजनिक शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झालेला असल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी किरणकुमार बकाले यांच्याविरुद्ध भादवी कलम १५३ अ,१५३ ब,१६६.२९४,५००,५०९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास पोलीस करीत आहे.