पाचोरा (प्रतिनिधी) –तालुक्यातील दहिगाव येथील एका ११ वर्षीय मुलाने घरात कुणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना आज येथे उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. गौरव प्रविण पाटील (वय – ११) मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , गौरव पाटील हा म्हसावद येथील इंग्लिश मेडीयम शाळेत शिकत असून त्याचे वडील प्रविण नथ्थू पाटील हे सहपत्नीक नाशिक येथे नातेवाईकांकडे गेले आहेत. तर घरी गौरव व मोठा मुलगा कॄष्णा यांची जबाबदारी भाऊ रविंद्र पाटील यांच्या कडे सोपविली होते. गौरव याचा मोठा भाऊ कॄष्णा हा घराकडे गेला असता त्याने दरवाजा ढकलून बघितला असता तो आतून बंद दिसल्याने त्याने काका रविंद्र पाटील यांना ही माहिती देताच पाटील यांनी त्या घराकडे धाव घेत दरवाजा तोडून आत बघितल्यावर गौरव हा छताला लटकलेल्या अवस्थेतआढळून आला .
याबाबत दहिगाव पोलिस पाटील विकास कोमलसिंग पाटील यांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली. पाचोरा ग्रामिण रुग्णालयात स्वप्निल पाटील यांनी दाखल केले. यावेळी डॉ. अमित साळूंके यांनी शवविच्छेदन करून दहिगाव संत येथे अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती पोलिस पाटील यांनी दिली.
याबाबत पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सचिन पवार हे करीत आहे.