पुणे (वृत्तसंस्था) – देशभरात करोनाचे सावट गडद होत आहे, त्यातून पुण्याची परिस्थिती अधिकच बिकट आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची चिन्हेही आहेत, अशा परिस्थितीत पुण्यातील सैन्य प्रशिक्षण संस्था असलेल्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’चा(एनडीए) मे महिन्यात होणारा दीक्षांत संचलन सोहळा यंदा रद्द होणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुण्यातील खडकवासला परिसरात वसलेली ‘एनडीए’ ही सैन्याच्या तिन्ही दलांना लष्करी प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था आहे. प्रबोधिनीतर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा दिमाखदार संचलन सोहळा येथून पासआऊट होणाऱ्या विद्यार्थ्यांना तर महत्त्वाचा असतोच परंतु, अनेक अर्थाने महत्वपूर्ण असतो. नोव्हेंबर आणि मे असे वर्षातून दोन वेळा हा सोहळा आयोजित करण्यात येतो.
यावेळी प्रबोधिनीतील प्रशिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लष्करी शिस्तीतील संचलन पाहण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक उपस्थिती दर्शवतात. याशिवाय आपल्या पाल्याचे कौतुक पाहण्यासाठी कुटुंबिय, नातलगही या कार्यक्रमाला आवर्जून येतातच. यानिमित्ताने भावी लष्करी अधिकाऱ्याच्या शक्तीचे प्रदर्शन होते शिवाय हा सोहळा म्हणजे लष्करी परंपरेचे एक उत्कृष्ट उदाहरणही असतो.
वरिष्ठ लष्करी अधिकारी, प्रशिक्षणार्थींचे पालक, शेकडो नागरिक यांच्या उपस्थितीत केले जाणारे संचलन, यावेळी सादर होणारी हवाई प्रात्यक्षिके, विविध कार्यक्रम यामुळे हा सोहळा अनेक अर्थानी वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. या कार्यक्रमासाठी आजपर्यंत राष्ट्रपतींपासून अनेक दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली आहे. या प्रबोधिनीला मानाचा राष्ट्रपतींचा ध्वजही प्रदान करण्यात आला आहे.
मात्र, यंदा या संचलन सोहळ्यावर करोनाचे सावट पसरल्याचे दिसून येत आहे. देशभरात करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या युद्धात या ‘रियल हिरों’च्या आनंदावर पाणी पडणार असे दिसत आहे. यंदा हा दीक्षांत संचालन सोहळा रद्द होणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रबोधिनीतील यंदाच्या संचलनाच्या आयोजनाबाबत विचारणा करण्यात आली असता, अद्याप याबाबत कोणताही निर्णय निश्चित झाला नसून, लवकरच त्याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असे लष्कर प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र या सगळ्या परिस्थितीत नक्कीच नागरिकांच्या आणि कॅडेटसच्या आरोग्याच्या दृष्टीने सुवर्णमध्य काढण्यात येणार असल्याचेही लष्कराच्या अधिकृत सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले.