संशयित तरुणाला पोलिसांनी घेतले ताब्यात

शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी
जळगाव (प्रतिनिधी) – : शहरामध्ये खून सत्र थांबण्याचे नावच घेत नाही. आज शनिवारी २३ जुलै रोजी हरी विठ्ठल नगर मध्ये रात्री ९ वाजता पुन्हा एकदा आपसातील वादामुळे तरुणाचा खून करण्यात आला असून याप्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे हरी विठ्ठल नगर मध्ये तणावाचे वातावरण असून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दिनेश काशिनाथ भोई (वय २८, हरी विठ्ठल नगर) हा रात्री ९ वाजेच्या सुमारास जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर बसलेला होता. त्यावेळी अचानक विठ्ठल नामक संशयित व्यक्तीने मागून येत दिनेशच्या डोक्यात कोयत्याने जोरदार वार केले. यात तो गंभीर जखमी झाला.

कुटुंबीयांनी व नागरिकांनी त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले.
दरम्यान, खून झाल्याची माहिती पसरताच हरी विठ्ठल नगर परिसरामध्ये तणाव निर्माण झाला आहे. खून करण्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. मयत दिनेश भोई हा सेंट्रींग काम करीत होता. त्याच्या पश्चात आई आणि मोठा भाऊ असा परिवार आहे.
दरम्यान, शहरांमध्ये खुनाचे सत्र कायम आहे. दोन दिवसापूर्वीच गेंदालाल मिल येथील तरुणाचा खून झाला होता तसेच शुक्रवारी नाल्यामध्ये तरुणाचा मृतदेह मिळून आला. त्याचा घातपात झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या दोन्ही घटना ताज्या असताना आता शनिवारी रात्री ९ वाजता हरी विठ्ठल नगर मध्ये खून झाल्याचे दिसून आले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस घटनेची माहिती घेत होते.
घटनेची माहिती कळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतली. संशयित विठ्ठल माऊली हटकर हा एका ठिकाणी लपला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एलसीबीचे विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख यांनी विठ्ठल हटकर यास ताब्यात घेतले.

घटनास्थळी गर्दी जमल्याने रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून रॉड हस्तगत केला आहे. जिल्हा रुग्णालयात नागरिकांची मोठी गर्दी जमली आहे. वैयक्तिक वाद आणि जुन्या वैमनस्यातून हा खून झाल्याचे समजते.








